ओबीसी आरक्षण ;सर्वपक्षीय चर्चेतुन तोडगा काढणार

मंत्रालय
 13 Sep 2021  450


-मुख्यमंत्र्यांशी अाज चर्चा करणार


-बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती


लोकदूत वेबटीम 

मुंबई 13 सप्टेंबर 


राज्य निवडणूक आयोगाने ६ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकाचा कार्यक्रम आज जाहीर केला. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत. पोटनिवडणुकांच्या मुद्यावर सर्वपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या संदर्भात उदया मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले

राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर  रोजी मतदान होईल.

या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली होती. उद्या मंगळवारी या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चाही होणार आहे.

आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही विनंती केली आहे. सर्वपक्षीय चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो निर्णय घेतला जाईल. जर चर्चेतून योग्य तो तोडगा निघू शकला नाही तर मात्र सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकांना सामोरे जाऊ.

एकीकडे ५ ऑक्टोबरला मतदान आहे. दुसरीकडे कोरोनाचे संकट आहे. पण सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय असल्याने कोणाचे काही चालत नाही. आमची भूमिका प्रामाणिक नसती तर सर्वोच्य न्यायालयात गेले नसतो असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.
.........
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. ६ जिल्ह्यात ज्या पोटनिवडणुका होत आहेत, तेथे ओबीसी आरक्षणाच्या जागाी ओबीसी उमेदवार देण्याचे राष्ट्रवादीने यापूर्वी घोषित केलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही उमेदवार देणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगतिले.
---------------------
राज्य सरकारने तीन महिन्यात ओबीसी आरक्षणप्रश्नी ठोस काही केले नाही. आेबीसी आरक्षणाशिवाय ६ जिल्ह्यातल्या पोटनिवडणुका होऊ देणार नाही.  राज्यघटनेने ओबीसींना दिलेले २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. गरज भासल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.