रायगड जिल्हाधिकारी पदी डॉ कल्याणकर

मंत्रालय
 20 Aug 2021  650

* मुख्यमंत्र्यांनी केल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबटीम

मुंबई 20 ऑगस्ट

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यात सर्वांचे लक्ष केंद्रित असलेल्या रायगड जिल्हाधिकारी पदावर अखेर डॉ. महेंद्र कल्याणकर यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. याठिकाणी असलेल्या निधी चौधरी यांनी मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक पदावर नियुक्ती केली आहे.

      महेंद्र कल्याणकर यांनी या पूर्वी कामगार विभागाचे आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद सीईओ चंद्रपूर आणि मंत्रालयात कामगार विभागाच्या सहसचिव पदावरही कर्तव्य बजावले आहे. आता त्यांच्याकडे शासनाने रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेली आहे.या सोबतच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावर नियुक्ती केली असून या ठिकाणी गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मीना हे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे येथे कार्यरत आहे.या ठिकाणी एम बी वारभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बीड जिल्हापरिषद सीईओ या पदावर कार्यरत असलेले अजित कुंभार यांची बृहन्मुंबई मनपा च्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली असून या ठिकाणी असलेले आशुतोष सलील यांची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे खाजगी सचिव पदावर नियुक्ती झाल्याने सदर पद रिक्त झाले होते.नुकतेच सनदी अधिकारी झालेले अजित पवार यांची बीड जिल्हापरिषद सीईओ तर संजय दैने यांची हिंगोली जिल्हापरिषद सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.