यांना मिळणार वैद्यकीय संचालकांचा अति.पदभार ?

मंत्रालय
 02 Jul 2021  3410

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 जुलै

 डॉ तात्याराव लहाने यांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या वैद्यकीय शिक्षण संचालक पदाच्या अतिरिक्त पदभार मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागात जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. यात प्रशासकीय लॉबीसह मंत्र्यांचीही  लॉबी सक्रीय झाली असून यात नांदेड़ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (अति.पदभार) डॉ दिलीप म्हैसेकर च्याकडे सचांलक पदाचा अतिरिक्त पदभार येण्याची शक्यता आहे.

     अतिरिक्त पदभार मिळण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले आणि पुणे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांचेही जोरदार प्रयत्नात असून  येत्या सोमवारी यासंदर्भात आदेश निर्गमित होणार आहे.

             वैद्यकीय शिक्षण संचालक पदावरून डॉ प्रविण शिनगारे हे निवृत्त झाल्यानंतर जवळपास 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून संचालनालयाचे सहसंचालक डॉ तात्याराव लहाने यांचेकडे संचालक पदाचा  अतिरिक्त कार्यभार होता. 30 जून रोजी डॉ लहाने हे निवृत्त झाल्याने संचालक पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून निवड करण्यात येणार आहे. याबाबत लोकसेवा आयोगाशी वैद्यकीय शिक्षण विभागाचा पत्रव्यवहार सुरू असून राज्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्याबाबत निर्णय झाला आहे.त्यामुळे नियमित संचालक पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड होत नाही तोवर संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहे. सोमवारी वैद्यकीय शिक्षण संचालक पदाच्या अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत आदेश निर्गमित होणार आहे. यासाठी संचालनालयातील नियमित सहसंचालक डॉ पाकमोडे आणि सह संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले डॉ चंदनवाले हे प्रयत्नात आहे. यासोबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मागील पाच वर्षे कुलगुरू म्हणून काम केलेले आणि सध्या नांदेड घेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले डॉ दिलीप म्हैसेकर यांनीही संचालक पदाच्या अतिरिक्त कार्यभार मिळण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहे.या चढाओढीत डॉ म्हैसेकर हे आघाडीवर असून त्यांच्या नावावर तिन्ही पक्षाकडून एकमत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

            विशेष म्हणजे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत 5 सप्टेंबर 2018 रोजी  सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे.यातील संकेतानुसार वैद्यकीय संचालनालायतील नियमित आणि जेष्ठ अधिकारी म्हणून सह संचालक( दंत) डॉ पाकमोडे हे कार्यरत आहे. परंतु  शासन आपल्या अधिकाराचा वापर करून  डॉ म्हैसेकर यांना संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यामुळे याबाबत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी आदेश निर्गमित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.