भाजप प्रदेश अध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील

मंत्रालय
 13 Feb 2020  660

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील,

मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची फेरनिवड

तभा वृत्तसेवा 

मुंबई 12 फेब्रुवारी 

राज्याचे माजी महसूल मंत्री तथा प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी  फेरनिवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुंबई अध्यक्ष बदलविण्यासाठी सुरु असलेल्या मागणीला दुर्लक्षित करीत   मुंबई अध्यक्ष म्हणून भाजपने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी घोषणा केली. 

राज्यातले  भाजप सरकार गेल्यानंतर  महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात विराजमान झाले.  त्या नंतर भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदींची नावे चर्चेत होती. मात्र अखेर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मुंबईच्या अध्यपदासाठी आशीष शेलार, खासदार मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. चंद्रकांत पाटील रविवारी भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.