गतिमान सामाजिक न्याय विभाग अशी ओळख निर्माण करणार

मंत्रालय
 06 Jan 2020  719

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई ०६ जानेवारी 

महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेल्या ना. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय खात्याचा पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यातील दालनात येऊन स्वीकारला. मुंडेंनी पदभार स्वीकारताच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकांनी दालनात गर्दी केल्याने  कार्यालय अक्षरशः हाऊसफुल झाले होते. 

आज पदभार स्वीकारण्यापूर्वी ना. धनंजय मुंडे यांनी दुपारी प्रथम दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत अभिवादन केले. चैत्यभूमीवर उपस्थित असलेल्या भिख्खू संघाने नामदार मुंडे यांना आशीर्वाद देत गौतम बुद्ध यांची प्रतिमा भेट दिली. 

त्यानंतर ना. मुंडे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व  स्व. मीनाताई ठाकरे यांनाही अभिवादन केले. पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून सहाव्या मजल्यावरील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. 

आदरणीय पवार साहेबांनी मला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या अतिमहत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दिली त्याबाबत मी साहेबांचे आभार व्यक्त करतो. समाजातील वंचित घटकांना न्याय देणारा हा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने समाजातील वंचित आणि गोरगरिबांसाठी चांगले काम केले आहे. यापुढेही हा विभाग अतिशय गतीमान पद्धतीने काम करणार. ज्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी मी चोख पद्धतीने पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी ना. मुंडे यांनी व्यक्त केली. 

वडापावची आली आठवण

त्याचबरोबर पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव खाऊन दिवस दिवस काढायचो आणि मंत्रालयातील लोकांच्या कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचो, त्यावेळी याच मंत्रालयात कधी आपण मंत्री होऊन येऊ असे वाटले नव्हते, अशा शब्दात आपल्या जुन्या आठवणी श्री. मुंडेंनी व्यक्त केल्या.

चौकट

पहिल्याच दिवशी कार्यालय हाऊसफुल; 2022 पर्यंत इंदूमिल येथील स्मारक पूर्ण करणार...

यावेळी ना. मुंडेंनी पदभार स्वीकारताच मंत्रालयातील सहावा मजला हाऊसफुल झाला होता. ना. मुंडेना शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपले प्रश्न व समस्या घेऊन आलेल्या अनेकांनी सहाव्या मजल्यावरील दालनात गर्दी केली होती.

 मुंडेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय विभागाचा सविस्तर आढावा घेतला. तब्बल पाच तास ही आढावा बैठक  चालली . त्यांनी यावेळी शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे,  तसेच इंदूमिल येथील स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास ना. मुंडेंनी व्यक्त केला. 

 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी या मातीत समता, बंधुता, न्यायाचे विचार रुजवले त्या साऱ्या महापुरुषांना हे मंत्रीपद समर्पित असल्याचेही ना. मुंडेंनी म्हटले आहे. आपल्या दालनात या महापुरुषांच्या प्रतिमांना त्यांनी वंदन केले.

चौकट

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन फकिरा हे पुस्तक भेट दिले.