सोशल मिडिया बंदी कायदा जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा

विदर्भ
 18 Dec 2019  464


* कायदा रद्द रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करणार
* शरद पवार यांचा निर्धार


लोकदूत वेब टीम
मुंबई18 

नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केल्या नंतर केंद्र सरकारने सोशल मीडिया विरोधी कायदा आणण्याचा इरादा केला आहे. हा कायदा म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा ठरणारा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. हा कायदा रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आपल्या तीन दिवसीय दौऱ्यावर नागपूर येथे आले आहे. या दौऱ्यात विविध कार्यक्रमासह पक्षाच्या आमदारांशी ही संवाद साधला. त्यानंतर बुधावरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवस्थानी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. यात बोलतांना शरद पवार यांनी सांगितले की , केंद्रातील मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यात जी राज्य नाही त्या राज्यातून मोठ्या प्रमाणात या कायद्याला विरोध होत असून देशभरातील विविध राज्यात तरुणाईने उत्स्फूर्तपणे या कायद्या विरोधात आवाज उठवला आहे. हा कायदा करतांना विरोध होणार नाही असा विश्वास केंद्र सरकारचा होता मात्र तो मोडीत निघाला असून देशातील तरुणाईने या कायद्याला छेद दिला आहे. सध्या देशभरातील विविध राज्यात असलेला तरुणाईचा विरोध पाहता 1977 साली जे पी नारायण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाचे उदाहरण देत, त्यावेळी त्या आंदोलनाने देशात सत्तांतर केले. त्यामुळे आज देशातील विविध राज्यात असलेल्या विरोध पाहता यातून देशात सत्तांतर शक्य असल्याचा विश्वास यावेळी खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. हा कायदा मंजूर केल्यानंतर आता सोशल मीडिया विरोधी कायदा आणण्याचा मानस केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. मात्र हा कायदा आणणे म्हणजे देशभरातील जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे मत खा.शरद पवार यांनी व्यक्त केला. या कायद्या विरोधात भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देने गरजेचे असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघर्ष करणार असल्याचा निर्धार यावेळी पावर यांनी व्यक्त केला. काही बाबतीत सोशल मोडिया नकारात्मक असला तरी त्या विरोधात कायदा आणणे अयोग्य आहे. या माध्यमातून केंद्र सरकारचा जनतेच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न आहे. मात्र या प्रयत्नांना देशातील तरुणाई मोठ्या प्रमाणात विरोध करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. या संदर्भात चर्चा करताना आपल्या पक्षातील लोकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर हालचाली सुरू केल्या असून यावर खा.पवार त्यांनी समाधान व्यक्त केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामाने दिल्लीकर खुश आहे. त्यामुळे दिल्लीच्या आगामी निवडणुकीत पुन्हा अरविंद केजरीवाल यांना यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.


चौकट...

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता राज्यात नवीन पर्याय निर्माण होऊ शकतो. यावर अनेकदा चर्चा केल्या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मविश्वास देने आवश्यक असल्याचे लक्षात आले. आणि आम्ही तो दिल्याने राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली असून राज्यात सरकारही विराजमान झाले. हे सरकार 5 वर्ष निश्चित टिकेल असा विश्वासही यावेळी शरद पावर यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशन संपताच दोन तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत यावेळी दिले.