भाजप नेत्यांवर योग्य वेळी कारवाई -खा.राऊत

मुंबई
 02 Apr 2022  265

भाजप नेत्यावर योग्य वेळी कारवाई
संजय राऊत यांची माहिती

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 एप्रिल 


महाविकास आघाडी सरकारला ज्या राजकीय व्यक्तींच्या कॉलरला हात घालायचाय, त्यांच्या कॉलरला योग्यवेळी नक्कीच हात घातला जाईल, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. गृहमंत्री  यांच्याकडून भाजप नेत्यांविरोधात पुरेशा तडफेने कारवाई होत नसल्यामुळे शिवसेना नाराजी असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आगामी काळात भाजप नेत्यांवर कारवाई होईल, असे संकेत दिले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली आहे. आम्ही सगळेच म्हणतोय की, गृहमंत्री उत्तम काम करत आहेत. केंद्रीय तपासयंत्रणा अतिरेकी पद्धतीने कारवाई करतात तशा आम्ही करणार नाही. सगळं कायद्याने होणार. योग्यवेळी कायदेशीर पद्धतीने संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे आम्ही सूडबुद्धीने कारवाई करणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

ईडी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी मी काही पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुराव्यांची दखल घेतली पाहिजे. एक खासदार म्हणून मी काही भूमिका मांडतो तेव्हा माझ्या पत्राची दखल घेणे भाग आहे. खासदारने दिलेल्या पुराव्याला महत्त्व असते, असे राऊत यांनी सांगितले. तसेच मी महाराष्ट्राच्या यंत्रणांकडे यासंदर्भात काही कागदपत्रे दिली आहेत. त्यावर लवकरच कारवाई होताना तुम्हाला दिसेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. भाजपचे लोक रोज नावं घेतात. मात्र, मी कोणाचीही नावं घेतलेली नाहीत. पोलिसांना त्यांचा तपास पूर्ण करू द्या. शेवटी राज्य हे कायद्याने चालते, असे संजय राऊत यांनी म्हटले.


राज्यातील घडामोडींना वेग,पोलीस महासंचालक-गृहमंत्र्यांची बैठक

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण सव्वातास चर्चा झाली. दिलीप वळसे-पाटील वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताच मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले. गृहमंत्रालयाचा कारभार उत्तमपणे सुरु आहे. मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज नाहीत, असे सांगण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात गृहमंत्रालयाकडून काही मोठे निर्णय घेतले जाणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
 

सकाळपासून राष्ट्रवादीकडे ग्रह विभागाविषयी नाराजी प्रकट करणारे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर  दिलीप वळसे-पाटील हे उत्कृष्ट गृहमंत्री आहेत असे प्रमाणपत्र राऊत यांनी दिले.