इंधन दरवाढ ; राष्ट्रवादीचा मोदींवर निशाणा

मुंबई
 17 Oct 2021  220

 

- कमनशिबी कोण याचे उत्तर देण्याची नवाब मलिक यांची मागणी

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 17 ऑक्टोबर 


'मेरे नसीबसे दाम कम हो रहे है' असे म्हणून इंधन दर कमी होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले होते. मग आता कुणाच्या नशिबाने भाव वाढत आहे? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी इंधन दरवाढीवरून मोदींवर निशाणा साधला. आता कमनशिबी कोण आहे, याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी मलिक यांनी केली.

गेल्या काही दिवसापासून सातत्याने पेट्रोल, डिझेलसह सीएनजी आणि एलपीजीचे दर वाढत आहेत. या दरवाढीवरून  मलिक यांनी रविवारी (ता.१७) प्रसार माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

देशात पेट्रोल - डिझेलच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढवली. 'अब की बार मोदी सरकार' असे म्हणत सत्तेवर आल्यानंतर मोदींनी  काही काळ भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी 'मेरे नसीबसे दाम कम हो रहे है, तो विपक्ष को क्यू बुरा लगता है. आपको नसीबवाला चाहिए की बदनसीबवाला चाहिए' असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते. हाच मुद्दा पकडत नवाब मलिक यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढीबाबत आता प्रश्न केले आहेत.