आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही काढणार शिवस्वराज्य यात्रा

मुंबई
 03 Aug 2019  394


नव्या स्वराज्याचा नवा लढा' ... शिवस्वराज्य यात्रेची टॅगलाईन...


*शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरुवात...*


*२२ जिल्हे... ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास...*

*पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा...*
 

मुंबई दि. ३ ऑगस्ट - राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.


ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.


शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेवून जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.


राज्याची आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रयतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. वीजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.


या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार आहे. त्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहे.युवकांच्या हाताला काम देणं, राज्यातील सगळ्या थरातील व्यवस्थेला मदत करण्याची भूमिका असणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 


ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे.


महाराष्ट्रात, देशात लोकशाहीने चालतो. सरंजामशाही शाहीचा काळ कधीच संपला आहे. परंतु संरजामशाहीला अपवाद होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्याकाळातही या युगपुरुषाने रयतेचे राज्य आणले. शेकडो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान कोट्यावधी लोकांच्या हदयात आदराचे आहे.


सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने शिवस्वराज्याची सनद देवून आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेवून जाणार आहे.