विप नेते फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई
 22 May 2020  295

 

* विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आरोप

* कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सराकर अपयशी

* गरिबांसाठी 50 हजार कोटी चे पॅकेज जाहीर करा 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 22 मे 

राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. मात्र राज्य सरकार जनतेच्या वेदनेकडे दुर्लक्ष करून आभासी जगातमशगुल असल्याची टीका करीत कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकार विरोधात भाजपकडून राज्यभरात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र बचाओ" या आंदोलनात प्रदेश भाजप कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विनोद तावडे,मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही ताण न आणता सदर आंदोलन यशस्वी केले.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार रोज केंद्र सरकारवर आरोप करीत आहे. मात्र त्यात त्यांना कुठलाच राजकीय गंध दिसत नसून आम्ही बोललो तर त्यावर राज्य सरकारला राजकीय गंध दिसतो. परंतु आम्ही जनतेच्या मुद्द्यावर बोलणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोलीस कर्मचारी कोरोना परिस्थितीत उत्तम काम करत आहे. जवळपास 1400 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. मात्र राज्य सरकारने पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोणतेच प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेतला नाही.उलट त्यांचे पगार कापत असल्याची टीका यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडुन अतिरिक्त सुरक्षा फोर्स ची मागणी केली आहे. मात्र हा सुरक्षा फोर्स मुंबई सारख्या ठिकाणी न वापरता महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी वापरला जात असल्याचे सांगत मुंबईत पोलीस दल दमला आहे. मात्र राज्य सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नसल्याचा हल्लाबोल करीत गृहमंत्र्यांनी यावर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचा टोला यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारला. राज्य सरकारच्या सरकारी रुग्णालयाची परिस्थिती बिकट असून खाजगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपाचारासाठी रुग्णालय उपलब्ध होत नसल्याने रुग्णाची होरपळ होत आहे.शिवाय रुग्णवाहिण्यांची कमतरता असल्याने रुग्णांचे बळी जात आहे. मृतदेहांशेजारी उपचार, एका खाटेवर दोन रूग्ण ठेवले जात आहे.कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रूग्णांवरील उपचारांची स्थिती सुद्धा अतिशय वाईट असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देशात एकूण रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात जवळपास 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात झाली आहे. तरीही राज्य सरकार गंभीर नसून पुढील परिस्थिती अधिक भयंकर होणार असल्याचे इशारा यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे. 

चौकट.....

50 हजार कोटींची पॅकेज द्या 

राज्यात शेतमाल खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी केंद्र सरकारने विविध पॅकेज जाहीर केले आहे. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. मात्र राज्य सरकारने अद्यापही कुठले पॅकेज जाहीर केले नसून राज्यातील सामान्यांना गोरगरिबांना आधार देण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.