पराभवाच्या नैराश्याने ग्रासल्यामुळे भाजपकडून बेछूट विधाने

मुंबई
 21 May 2019  370
मुंबई : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व निंदनीय आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने भाजपला नैराश्याने ग्रासले असून, त्यामुळे त्यांची प्रचाराची पातळी खालावून बेछूट, बेताल विधाने केली जात असल्याचे टीकास्त्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सोडले आहे.

सोमवारी दुपारी प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना पुढे ते म्हणाले की, यापूर्वी अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. सरकारे आली आणि गेली. पण यापूर्वी इतिहासात कधीही कोणत्याही पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा स्तर भाजपप्रमाणे घसरला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत वापरलेली भाषा योग्य नाही. मते मिळवण्यासाठी अशा पद्धतीने प्रचाराची पातळी खाली आणणे लोकशाहीसाठी घातक आहे.