स्ट्रॉंगरुमध्ये जँमर बसवा आणि उमेदवारांना प्रवेश देवू नका

मुंबई
 21 May 2019  26

मुंबईः प्रतिनिधी


ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये अशी मागणी करत स्ट्रॉंग रूममध्ये जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे आक्षेप घेतला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्ट्राँग रूममध्ये जँमर बसविण्याची मागणी केली.


महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी नियोजन व अंमलबजावणीबद्दल निवडणूक आयोगाचे त्यांनी अभिनंदन करत आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते. लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्रॉंगरुमध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी दिल्या गेलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत आमचा आक्षेप असून याचा निषेध करत असल्याचेही ते म्हणाले.


दरम्यान यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना या स्ट्रॉंगरुमध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली.

सत्ताधारी पक्षाचे उमेदवार या तांत्रिक करामतीचा अवलंब करुन दुरुस्त पद्धतीने या ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या निकालामध्ये बदल करु शकतील अशी भीती ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मतदान पश्चात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होवून भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या कायद्यामध्ये अधिक्षेप होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये रिमोट पध्दतीने अनेक बदल घडविता येतात हे प्रगत तंत्रज्ञानाने सिद्ध करुन दाखवले आहे. त्यामुळे याबाबत आपण विषाची परीक्षा घेवू नये. कुठल्याही आशंकेला जागा राहिल आणि लोकांचा लोकशाही पद्धतीवरील विश्वास उडेल अशा पद्धतीचे कोणतेही निमित्त निर्माण होवू नये यासाठी दक्ष राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूममध्ये ‘जॅमर बसविण्याची काँग्रेसची मागणी-चव्हाण


सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची भेट घेतली. यासंदर्भात माहिती देताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर समाजातील अनेक घटकांनी प्रामुख्याने काही तज्ज्ञांनी वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून स्ट्राँगरूममधील मतदान यंत्रांशी छेडछाड होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे घडले तर तो लोकशाहीसाठी एक गंभीर धोका असेल. हा धोका टाळून निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता कायम रहावी, यादृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यातील सर्व स्ट्राँगरूममध्ये तातडीने जॅमर बसविण्याची मागणी केली.