दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार -शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेणार भेट....

मुंबई
 19 May 2019  24

मुंबई लोकदूत वेबटीम 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून आमच्या काळात केलेल्या उपाययोजना आणि आजच्या परिस्थितीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचे निवेदन देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकांची रणधुमाळी संपते ना संपते तोच सोलापूर आणि उस्मानाबाद या दुष्काळी जिल्हयाच्या पाहणी केली. तिथल्या दुष्काळी जनतेशी संवाद साधल्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


दुष्काळ निवारणासाठी काय काय उपाययोजना करता येतील याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक घेण्यात आली. 


या बैठकीत परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यात पडलेला नाही. पर्जनछायेत महाराष्ट्रातला बराचसा भाग येतो. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गंभीर दुष्काळ परिस्थिती आहे. पिण्याचे पाणी, रोजगार, चारा छावण्या या तीन उपाययोजना कराव्या लागतात. यासोबतच पिक जर वाया गेले तर त्याला मदत करावी लागते. विशेषत: फळबागांना विशेष मदत द्यावी लागते. कारण फळबागांचा फायदा मिळायला पाच ते दहा वर्ष जातात. त्यामुळे दुष्काळात फळबागायतदारांचे जास्त नुकसान होते या विषयावरही चर्चा झाली. 


फळबागा वाचवण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, यावर आमचा भर असणार आहे. पुर्वीचे सरकार चारा छावण्यात शेतकर्‍यांची सरसकट जनावरे घ्यायचे. मात्र आज शेतकर्‍यांचे फक्त पाच जनावरे घेण्याचे बंधन आहे. तसेच प्रत्येक जनावरामागे फक्त ९० रुपये खर्च केले जातात. ते पुरेसे नाहीत. सध्या राज्यात चारा छावण्यात कडबा दिला जातोय, मात्र तो अपूरा आहे. त्यासोबत ऊसाचे वाढे खायला दिले जात आहे, त्यामुळे जनावरांची जीभ कापली जाते.यासोबतच सरकारने 
सर्व प्रकारच्या वसुली तात्काळ थांबवावी. पिक कर्ज आता शेतकरी देवू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात कर्जाचे पुर्नगठन करणे आणि पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकर्‍याला बी-बियाणे, खत विकत घेण्यासाठी पुन्हा कर्ज स्वरुपात मदत दिली गेली पाहीजे अशी मागणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली अशीही माहिती शरद पवार यांनी दिली. 


त्यासोबत जूनमध्ये महाविद्यालय सुरु होणार आहेत. शैक्षणिक शुल्क माफ केल्यास विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळू शकेल. या मागण्यांचा आराखडा बनवून सरकारकडे दिला जाईल. राज्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही शरद पवार म्हणाले. 


तसेच सहकारी संस्था, सीएसआर यातूनही शेतकर्‍यांना मदत दिली जावी. तसेच आमिर खानने सुरु केलेल्या वॉटर कपला जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा द्यावा अशी घोषणाही शरद पवार यांनी केली.


राष्ट्रवादीची विद्यार्थी आणि युवक संघटना दुष्काळग्रस्त भागात काम करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले. 

सरकारने दुष्काळाचे गांभीर्य घेतले नाही. पंतप्रधानांनी  राज्यात सहा ते सात सभा घेतल्या. यात राजकीय टीका होतच राहिली. शरद पवारवर टीका करणे त्यांचा उद्देश असू शकतो. मात्र राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काय काम करणार? हे सांगण्याची संधी त्यांनी गमावली असा थेट आरोपही शरद पवार यांनी सरकारवर केला. 


निवडणूक आयोगाची काहीच अडचण नाही आम्ही २०१४ साली निवडणूक आयोगाला फोन वर सांगायचो की, आम्हाला दुष्काळासाठी अमुकतमुक काम करायचे आहे, त्यानंतर एक - दोन सात आम्हाला आयोगाची परवानगी मिळून जायची. कारण आयोग देखील या देशातीलच आहे. मात्र हे सरकार आयोगाच्या कोणत्या परवानगीसाठी थांबले आहे, माहीत नाही अशी जोरदार टिकाही शरद पवार यांनी केली. 


लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या मी दुष्काळ दौरा केला त्यामुळे सरकार जागे झाले आणि त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. मी जर दौरा केला नसता तर तेही झाले नसते असेही शरद पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 


गडचिरोलीतील प्रकार चिंताजनक आहे. मी मुख्यमंत्री असताना नक्षलवादाची सुरुवात झाली होती. पण आम्ही त्याकडे फक्त कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहीले नाही. तर विकासापासून वंचित राहिलेल्या या परिसराला विकासात कसे आणता येईल? याकडे लक्ष दिले. जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले तर नक्षली लोकांच्या नाराजीचा फायदा उचलतात असेही शरद पवार म्हणाले. 


पुर्वीचे राज्य असताना राज्याचे गृहमंत्री सांगलीचे असूनही त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले होते असे स्थानिक लोक मला सांगत होते. मात्र आत्ताचे गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहण्यासाठी गडचिरोलीला जातात हे चित्र चिंताजनक आहे असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 


आर. आर. पाटील यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेत जी सकारात्मकता आणली होती. आजचे सरकार अशाप्रकारचे कोणतेही कार्य करताना दिसत नाही असेही शरद पवार म्हणाले.