कॉंग्रेसची सेवाग्राम येथे पदयात्रा
२ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथे काँग्रेस सेवादलाची पदयात्रा
* राहुल गांधी येण्याची शक्यता
लोकदूत वेबन्यूज टीम
मुंबई २५ सप्टेंबर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त सेवाग्राम, वर्धा येथे २ ऑक्टोबर रोजी भव्य पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी दिली आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही पदयात्रा सकाळी १० वा. बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरु होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक रत्नाकर सभागृह, म्हाडा कॉलनीसमोर, सेवग्राम रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
- पदयात्रेत सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गणवेशात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी केले आहे.