भीमच्या मृत्युने आठवलेंचा पारा भडकाला

मुंबई
 24 Sep 2019  743

भीमचा मृत्यु झाला, पँथरचा पारा चढला


-रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या भीम बिबळ्याचा  अकाली मृत्यु 


-बोरिवली नॅशनल पार्कसमोर उद्या रिपाइंचे आंदोलन

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई 24 सप्टेंबर 


रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारता राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या भीम या बिबळ्याचा रविवारी बोरिवली राष्ट्रीय उद्यानात मृत्यु झाला. या घटनेने रिपाइं कार्यकर्ते संतप्त झाले असून मंगळवारी ते वनविभागाच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार आहेत. 


बोरीवली राष्ट्रीय उद्यानात प्राणी दत्तक योजना राबवण्यात येते. त्याअंतर्गत रामदास आठवले यांनी तीन वर्षापूर्वी एक बिबळ्या दत्तक घेतला होता. त्यासाठी आठवले दरवर्षी दत्तक करार करत होते. त्यापोटी १ लाख २० हजार रुपये वनविभागाला देत होते. 


आज आठवले यांच्या कार्यकर्त्यांना ही दुख:द बातमी समजली. त्यानंतर त्यांनी बोरीवली राष्ट्रीय उद्यानाकडे खुलासा मागितला. मात्र या बिबळ्याचा अंत्यविधी केला असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपाइं कार्यकर्त्यांनी केली आहे.


आठवले यांचा मुलगा जीत याच्या हट्टामुळे या बिबळ्याला दत्तक घेण्यात आले होते. त्याचे नामकरण भीम असे केले होते. दरवर्षी दत्तक करार करण्यासाठी पूर्ण आठवले कुटुंबिय बोरीवली राष्ट्रीय उद्यानात जात असे. 


आठवेल हे सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना सदर घटना कळवण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी आंदोलन करण्यास अनुमती दिली असल्याचे रिपाइंचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी  सांगितले.

 

एकुण  दत्तक घेण्यास लोक पुढे येत नाहीत, असे वनविभागचे म्हणणे होते. मात्र या घटनेमुळे बोरीवली राष्ट्रीय अद्यानातील दत्तक योजना सध्या वादात सापडण्याची शक्यता आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधु तेजस यांनी एकएक वाघ दत्तक घेतलेला आहे.  

-----------