कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढविणार

मुंबई
 23 Sep 2019  378

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई  23 सप्टेंबर 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जाहिरनामा समितीच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार हेमंत टकले, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश तपासे, महेश चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख उपस्थित होते.
आमचा जाहीरनामा तयार होता. परंतु घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आमच्या आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. अजून काही पक्ष आमच्यासोबत येणार आहे. त्यांच्यासोबतचे जागा वाटप लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत पवारसाहेबांबद्दल वक्तव्य केले. परंतु त्यांनी कलम ३७० वरुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केल्याचा आरोप करत वर्षभरापूर्वी मेहबूबा मुफ्ती सोबत सरकार चालवत होतात. ते कोणत्या देशात असा खोचक सवालही त्यांनी यावेळी अमित शाह यांना विचारला.
काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यात आला आहे. पहिल्यापासून फडकत आहे. दोन झेंडे होते ही वस्तुस्थिती आहे. आरएसएसच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकवला गेला नाही. आम्ही आंदोलने केल्यावर फडकवला गेला. याचं उत्तर पहिल्यांदा द्यावे असा आग्रह त्यांनी यावेळी धरला.
काश्मीरमध्ये ७० दिवसात एकही गोळी चालली नाही असे अमित शहा बोलत आहेत. मग अद्याप कर्फ्यू का काढण्यात आला नाही असा सवाल करत काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. याबद्दल दुमत नाही. तीन प्रकारची जनता काश्मीरमध्ये आहे. मुठभर लोकं पाकिस्तानात जायचं बोलत आहेत. परंतु बहुसंख्य लोक भारतात येवू इच्छीत आहेत. ३७० कलमाचा निर्णय लोकांना विश्वासात घेवून केला पाहिजे होता. परंतु तसं झालं नाही हे पवारसाहेबांनी आपल्या भाषणातही सांगितल्याची आठवणही त्यांनी यावेळई करून दिली.
काश्मीरची जागा आता पर्यटकांच्या नावाखाली खरेदी केली जाणार आहे आणि त्या जागा अदानी, अंबानी यांना देण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नागा अकॉर्ट केले त्यात काय झालं मोदींनी उत्तर द्यावे. नागालॅंडचा झेंडा का वेगळा दिला तेही सांगा. आम्ही मुद्दे उपस्थित करत आहोत त्याचं उत्तर भाजपाने द्यावे. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही म्हणून ते ३७० चा मुद्दा आणत असल्याचेही ते म्हणाले.
मेट्रोची कामांना आघाडीच्या काळात मंजुरी देण्यात आली. त्याचं श्रेय आजचे सरकार घेत आहे. सगळ्याच क्षेत्रात हे अपयशी ठरले आहे.
आर्थिक मंदी, बेरोजगारी निर्माण झाली आहे त्यावर उपाययोजना सरकारने केलेली नाही. राष्ट्रवादी कमकुवत होत आहे असा आरोपही केला जातोय. परंतु पवारसाहेबांच्या सभांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ता ताकदीने उभा आहे. परिवर्तन हे नक्की होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शाहु, फुले, आंबेडकर विचारांचे राजकारण शरद पवार करतात. त्यामुळे त्यांचे राजकारण कधीच संपणार नाही. परंतु भाजपाच्या गोळवळकर गुरुजींच्या विचारांचे राजकारण किती काळ टिकेल हे लवकरच कळेल. तसेच आमच्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवादी आहे. मात्र भाजपाचा राष्ट्रवाद हा नकली असल्याचा आरोपही त्यांनी केला.