राज्याचे नवे मुख्य सचिवपदी अजोय मेहता, तर मुंबईच्या आयुक्त पदी परदेशी

मुंबई
 08 May 2019  383

मुंबई १० प्रतिनिधी 

केवळ चाळीस दिवस राज्याच्या मुख्य सचिव पदी असलेले  युपीएस मदान यांनी आज अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिव पदावर  मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव  प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे . प्रवीण परदेशी हे गेल्या साडेचार वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील म्हणून परिचित आहे. दोन्ही अधिकारी आपआपल्या पदाची सूत्रे सोमवारी घेणार असल्याचे समजते. 

मावळते मुख्य सचिव मदान यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दाखल केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तात्काळ मंजूर केला आहे. त्यामुळे  करार पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागार पदी मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भांत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश निर्गमित केले आहे. त्याच बरोबर पुढील आठवड्यात सिकॉमच्या अध्यक्षपदी युपीएस मदान यांची नियुक्ती करण्यासही  मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या संदर्भात उद्योग विभाग स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करणार आहे.
 
गेल्या दोन दिवसापासून राज्यातील प्रशासनात मोठ्याप्रमाणात फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयात मोठ्या हालचाली सुरु होत्या. मावळते मुख्य सचिव युपीएस मदन हे ३१ सप्टेंबर रोजी निवृत्त होणार होते. मात्र मदान हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद हे सचिव दर्जाचे असल्याने मुख्य सचिव स्तरावरील अधिकारी म्हणून कमी महत्वाचे पद असल्याचे मानले जाते. त्यामुळेच मदान यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर जाण्यास नकार दिल्याने ऐनवेळी मुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली होती. शिवाय मदान यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष सल्लागार म्हणून कुठल्या आधारावर नियुक्त करायचे ? याबाबत सामान्य प्रशासन विभागाने त्रुटी काढली होती. यावर दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी खलबते झाल्यावर मदान यांनी सेवानिवृत्ती घेतल्याने त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार प्रथम एक वर्षाच्या अथवा मुख्यमंत्र्यांचे पुढील आदेश होईपर्यंत विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले. मदान हे सप्टेंबर महिन्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदावर विराजमान होणार असल्याची चर्चाही सुरु आहे.  शिवाय मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव पदावर मनुकुमार श्रीवास्तव यांची वर्णी लागणार की संजीव जैस्वाल मुख्यमंत्री कार्यालयात येणार यावर मात्र अद्याप निर्णय होऊ शकला नाही. मुख्य सचिव पदी आणि मुंबई मनपा आयुक्त पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी यांना सुरनीस म्हणून मुख्यमंत्र्यांनी बसवून प्रशासनावर असलेली पकड अधिक मजबूत करण्याचे संकेत दिले असून पुढील काही दिवसात मंत्रालयासह अन्य राज्यस्तरावरील प्रशासनातही मोठे फेरबदल केले जाणार आहे.