आरोग्य विभागाच्या संचालक पदी डॉ साधना तायडेंची नियुक्ती

महाराष्ट्र
 20 Aug 2019  681

 आरोग्य खात्याच्या संचालक पदी डॉ साधना तायड़े 

* खात्याच्या दोन्ही संचालक पदाची धुरा महिलांच्या हाती 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 20 ऑगस्ट 

राज्याच्या आरोग्याची सम्पूर्ण जबाबदारी असलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मुख्यालयातील संचालक पदी डॉ साधना तायड़े यांची नियुक्ती राज्य सरकारने लोकसेवा आयोगाच्या सिफारशीनुसार केली आहे. विशेष म्हणजे आरोग्य खात्यात दोन संचालक पद निर्माण करण्यात आले असून दोन्ही पदावर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आदेश जाहीर करताच डॉ साधना तायड़े यांनी संचालक पदाची सूत्र घेतली.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अंतिम फेरीसाठी १० जणांची निवड झाली होती. या जणांमधून डॉ. तायडे यांची निवड करण्यात आली आहे. चाळणीतून सध्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांचे नाव गळाले. डॉ. रेखा गायकवाड यांनीदेखील अर्ज केला होता. पण, शैक्षणिक अर्हतेची पूर्तता न केल्याने त्यांचाही अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अशा अनेक डॉक्टरांनी या पदासाठी परीक्षा दिली होती. यातून डॉ. तायडे यांना हे पद सोपवण्यात आले आहे. माजी संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. सार्वजनिक आरोग्य विभागात पूर्वी एकच संचालक होते. परंतु आता दोन संचालक आहेत. दुसऱ्या पदाचा कार्यभार डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी आरोग्य संचालनालयाचे आयुक्त म्हणून डॉ. अनुपकुमार यादव यांची निवड केली होती. एक संचालक पद रिक्त असल्याने आयुक्त डॉ. यादव यांच्यावर कामाचा ताण वाढत होता. अखेर संचालक म्हणून डॉ. तायडे यांना कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ. तायडे याआधी आरोग्य सेवा संचालनालयाच्या मनोरुग्ण विभागाच्या सहसंचालक म्हणून काम पाहत होत्या.