महाविकास आघाडीत बिघाडी

महाराष्ट्र
 27 Jan 2022  220

आघाडी सरकारात काँग्रेसची कामे होत नाहीत

काँग्रेस नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
महाराष्ट्र प्रभारींच्या बैठकीत नेत्यांचा सूर 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 जानेवारी 
राज्यातील महाविकास आघाडीमधील असंतोष पुन्हा एकदा दिसून आला. आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या सावत्र वागणुकीबद्दल अनेक वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमोर गुरुवारी  नाराजी व्यक्त केली.  मुंबईत पार पडलेल्या आजच्या बैठकीत पक्षातील अनेक नेत्यांनी पाटील यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. काँग्रेसच्या आमदार, मंत्र्यांची कामे होत नसल्याची तक्रार केल्याचे समजते. या बैठकीत राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक निकालावर सविस्तर चर्चा झाली.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची विशेष बैठक आज मुंबईत वांद्रे कुर्ला काॅम्प्लेक्स येथे पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्षांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला एच.के.पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत नाना पटोले म्हणाले की, राज्यात नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या आहेत. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली तसेच आगामी  निवडणुकांबाबतही चर्चा झाली. मालेगावातील काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या पक्षप्रवेशावर नाना पटोले म्हणाले की, जे स्वखुशीने जात असतील त्यांना नाराजी कळवण्याची गरज नाही. काँग्रेसकडून राष्ट्रवादीत जात असतील तर राष्ट्रवादीतून आमच्याकडे येणार आहेत. मात्र त्याबाबत गोपनीयता पाळणे गरजेचे आहे.

राज्यात ६५ पेक्षा अधिक महामंडळे आहेत. या महामंडळावर नियुक्त नियुक्तीची यादी तयार असून ती टप्प्याटप्याने जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली. या बैठकीला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हजेरी न लावल्याने ते नाराज असल्याचे समजते. पटोले यांनी मात्र त्याला पूर्णविराम दिला. बैठकीला आजी, माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री व इतर काही मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे राऊत यांना आमंत्रण नव्हते, असे पटोले म्हणाले.
----------------