मनपा निवडणुकीत आघाडीसाठी पुढाकार - ना.भुजबळ

महाराष्ट्र
 10 Jan 2022  272

महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न – मंत्री छगन भुजबळ

*महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच विभागनिहाय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार

लोकदूत वेबटीम 

मुंबई 10 जानेवारी 


आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अॅड. गौरव गोवर्धने, शहर सरचिटणीस संजय खैरणार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जिवन रायते, मकरंद सोमवंशी, प्रांतिक सदस्य महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्यसरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात केस दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार असून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढविण्यासाठी काम करावे. त्यादृष्टीने अधिक प्रयत्न करावे. तसेच विविध उपक्रम राबवीत असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून उपक्रम राबविण्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती असून वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दृष्टीने अधिक जोमाने कामाला लागावे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची इच्छा  उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.