कोविडच्या नव्या व्हेरियंटचे 6 रुग्ण बाधित

महाराष्ट्र
 30 Nov 2021  243

आफ्रीकेतून आलेले ६ प्रवासी कोविड बाधीत

यंदा महापरिनिर्वाण दिनी घरुन अभिवादन करा
-गृह विभागाने काढल्या सूचना
-चैत्यभूमीवर स्टाॅल, दुकाने, सभा, प्रदर्शनास बंदी

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 30 नोव्हेंबर 


आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून महाराष्ट्रात आलेले ६ प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला असून या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने मंगळवारी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोविड बाधित आले असून त्यांचेही नमुने एन आय व्ही पुणे येथे जनुकीयशोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.

युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन आढळून आला आहे असे इतर ११ देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आर टी पी सी आर टेस्ट करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत.

जे प्रवासी आर टी पी सी आर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही ७ दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा टेस्ट करण्यात येईल आणि ते कोविड बाधित आढळल्यास त्यांच्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे.

जे प्रवासी ओमिक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत त्यांच्यातील देखील ५ टक्के प्रवाशांची प्रयोगशाळा तपासणी करुन त्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे.
----------------------------
कोरोनाच्या ओमायक्राॅन विषाणुच्या पार्श्वभूमीवर यंदा ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीवर न येता घरी राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, अशा सूचना राज्याच्या गृह विभागाने आज जारी केल्या.

चैत्यभूमीवर खाद्यपदार्थ, पुस्तक विक्री, प्र्रदर्शने यांचे स्टाॅल लावण्यास बंदी आहे. पालिकेने तशी तयारी करावी. येथे सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. चैत्यभूमीव अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम होतो. त्याला दोन लसमात्रा घेतलेल्या मंडळींना उपस्थिती लावता येणार आहे. तसेच सर्वांची थर्मल स्कॅनींगने शारिरीक तापमान मोजूनच त्यांना चैत्यभूमीवर येता येईल.
-------------
राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्या तरी मुंबईत मात्र पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व शाळा या १५ डिसेंबरपासून चालु केल्या जाणार आहेत. ओमायक्राॅन विषाणुच्या पार्श्वभूमीवर दोन आठवडे स्थितीचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानंतर शाळा उघडण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे.  
----
मुंबईत आज १८७ कोरानाचे नवे रुग्ण आढळले. तर दोघा रुग्णाचा मृत्यु झाला. मुंबईत आज २९ हजार २२३ आरटीपीसीआर कोराेना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६९४ नातेवाईकांचा शोध घेण्यात आला आहे.
---------
राज्यात आज ६७८ काेरोना रुग्ण आढळले. ३५ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला. राज्यात आजमितीस ७ हजार ५५५ कोरोना रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-