उल्हासनगरात एकाच कुटुंबातील 5 कोरोनाग्रस्त रुग्ण - आयुक्त

महाराष्ट्र
 30 Apr 2020  301

* उल्हासनगरमध्ये 8 क्वारंटाइन रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह 

लोकदूत वेबटीम 

उल्हासनगर 30 एप्रिल 

 

उल्हासनगर शहरातील फॉलॉवर लाईन येथील दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी 87 वर्षीय मयत महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. तसेच त्या भागातील रहिवाशांना मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण होते. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे सुद्धा चिंता वाढली होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाच्या नजीकचे संपर्क यांना तात्काळ quarantine करण्यात आलेले आहे. सर्वसाधारणपणे सात दिवसानंतर कोरोना रोगाची लक्षणे दिसत असल्याने quarantine करण्यात आलेल्या जवळच्या संपर्काचे नमुने चार ते पाच दिवसानंतर घेऊन पाठविले जाणार आहेत.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील यापूर्वी चाचणीसाठी पाठवलेल्या आणखी आठ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवालांचे कोरोना निगेटिव अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक पोलिस कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या अहवालांचा विचार करतात आज शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

उल्हासनगर शहरातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये एकूण 12 रूग्ण असून यापैकी 11 कोरोनाग्रस्त तर 1 SAR Beco रूग्ण आहे. 11 रुग्णांपैकी 5 रुग्ण उल्हासनगर शहरातील एकाच कुटुंबातील असून 5 रुग्ण बदलापूरचे आहेत व 1 रुग्ण कल्याण येथील आहे. रुग्णालयात सर्व प्रकारे खबरदारी घेतली जात असल्यामुळे कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. सर्वांच्या प्रकृती उत्तम असून ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार किमान दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर टप्प्याटप्प्याने या रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल.

वेळेत उपाययोजना केल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो. मात्र भीतीपोटी आजार दडविल्यासा त्याचे न्युमोनियामध्ये रूपांतर होऊन या रुग्णाच्या जीवितास धोका पोहोचतो. तसेच हा रुग्ण उपचाराविना बाहेर राहिल्यामुळे त्याचा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रादुर्भाव होऊन साथ रोगाच्या प्रसारास मदत होते. त्यामुळे कोरोना रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब महानगरपालिकेच्या स्थापन केलेल्या फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करणे आवश्यक आहे.

शहरात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा प्रकारच्या लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन स्वतः तपासणी करून घेतल्यास भविष्यात या रोगाचा प्रसार थांबविण्यास व पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास प्रशासनास यश येईल.

उद्या दिनांक 1 मे 2020 पासून फळे व भाजीपाला विक्रीसाठी दुपारी 2.00 वाजेपर्यंत अनुमती देण्यात येणार आहे. तथापि ही फळे व भाजीपाल्याची विक्री केवळ ज्या विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी परवानगी दिली आहे त्यांनाच केवळ प्रभाग अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवर करता येईल. परवानगी नसलेले किंवा ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त विक्री व्यवसाय करणारे फळे व भाजीपाला विक्रेते यांचे संपूर्ण साहित्य व दुकान किंवा हातगाडी तात्काळ जप्त करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

उल्हासनगर-5 येथील एक, जिजामाता कॉलनी संभाजी चौक येथील एक व फॉलॉवर लाईन येथील एक अशा तीन कंटेनमेंट झोनचे नियमांचे सर्व नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे. ही सक्ती कुणाला त्रास देण्यासाठी नसून सर्वांच्या भल्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनास व महानगरपालिकेस सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले.