पर्यटन संचालनालयाच्या संवेदनशिलतेमुळे मिळाला 70 परदेशी पर्यटकांना आसरा

महाराष्ट्र
 15 Apr 2020  286

* कोरोनामध्ये पर्यटन संचालनालयाचा संवेदनशीलपणा 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 13 एप्रिल

देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित झाल्याने महाराष्ट्रात आलेल्या परदेशी पर्यटकांसाठी " अतिथी देव भव" असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्याचा पर्यटन विभाग मायबाप म्हणून धावून आला. लॉक डाऊनमुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या पर्यटकांना मदतीचा हात देत त्यांना योग्य सुविधा पुरवत, सुरक्षित ठिकाणी आणि त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आता पर्यटन 5 परदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशात परत पाठविण्यात पर्यटन संचालनालयाला यश आले असून डब्बा 65 परदेशी पर्यटकांना योग्य मार्गदर्शन करीत यांचीही संपूर्ण जबाबदारी पर्यटन संचालनालयाने घेतली आहे.
देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन देशभरात घोषित केला. त्यामुळे त्या आधीपासून अमेरिका,कोलोम्बिया ,फ्रांस,जर्मनी आणि अन्य युरोपीय खंडातील विविध देशातील, तब्बल 70 पर्यटक महाराष्ट्राच्या विविध भागात असलेल्या पर्यटन स्थळी होते.मात्र अचानक लॉकडाऊन घोषित केल्याने आणि आनंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद केल्याने राज्यातील सर्व 70 विदेशी पर्यटक अडचणीत सापडले होते. या अडचणीतून मार्ग काढत आपल्या देशाशी संपर्क कसा साधावा असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक परदेशी पर्यटक हतबल झाले होते. परंतु लॉकडाऊन असतांनाही राज्याच्या पर्यटन संचालनालयाने देशाचे आणि महाराष्ट्रचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल अशी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन विभाग,महाराष्ट्राचे पर्यटन सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यटन संचालनालयाने राज्यातील विविध पर्यटनस्थळी अडकलेल्या परदेशी नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्याकडे संपर्क साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या त्या विभागातील पर्यटन उपचनालकांच्या माध्यमातून त्यांना मुंबईत सुरक्षित रित्या आणण्यात आले. राज्यात विविध जिल्ह्यात जिल्हाबंदी असतांनाही पर्यटन संचालनालयाने त्यांच्या उपसंचालकांच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मुंबईपर्यंत सुखरूप आणले. त्यानंतर त्यांच्याकडून माहिती गोळा करून त्यांच्या देशाच्या भारतातील दूतावासशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या देशातील पर्यटकांची माहिती देऊन त्यांच्याकडील घेण्यात आलेल्या कार्यवाहीची वेळोवेळी त्या त्या देशातील पर्यटकांना माहिती देत व मार्गदर्शन करत त्यांना आधार दिला. 
यासाठी पर्यटन संचालनालयात एक विशेष कक्ष निदान करण्यात आला असून त्या माध्यमातून राज्याच्या पर्यटन सचिव वल्सा नायर यांच्या मार्गदर्शना नुसार भारत सरकारच्या विदेश मंत्रालय,पर्यटन मंत्रालय भारत सरकार,नागरी उड्डायन विभाग यांच्याशी संपर्क साधून त्या त्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधला. त्यामुळे त्या त्या देशातील दुतावासांनी त्यांच्या देशाच्या सरकारशी संपर्क साधून महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना मायदेशी परत घेऊन जाण्यासाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाने महत्वाची आणि मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे त्या त्या देशांनी मुंबईत त्यांचे विमान पाठवून त्यांच्या नागरिकांना घेऊन जाण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून 5 परदेशी नागरिक त्यांच्या देशात सुखरूप पोहचले आहे.यात नागपूर येथे पेंच या जंगलात पर्यटनासाठी आलेल्या मायकल स्टप्लझिंग आणि एलेक्झांडरा सिमोनी या पती पत्नी पर्यटक असलेल्या 2 जर्मन नागरिकांना नागपुरातून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या देशाशी संपर्क साधून त्यांच्या दुतावासाला योग्य माहिती देण्यात आली. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती या पर्यटकांना देत त्यांना त्यांच्या देशात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या सरकारांनी केलेल्या कार्यवाहीचा योग्य तपशील देत मार्गदर्शन केले. त्यामुळे या नागरिकांना 27 मार्च रोजी त्यांचे मायदेश असलेल्या जर्मनीला विमानाद्वारे पोहचविण्याची कामगिरी पर्यटन संचालनालयाने बजावली. फ्रांस येथील रहिवासी असलेले क्रिस्टीन रोलँड हे औरंगाबाद ला पर्यटनासाठी आले असता, लॉक डाऊनमुळे अडचणीत सापडले होते. त्यांच्याशी संपर्क साधून पर्यटन संचालनालय त्यांना त्यांच्या देशात 3 एप्रिल रोजी पाठविण्यासाठी यशस्वी ठरले. सांगली मध्ये पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकेचे नागरिक असलेले अकबर बिमजी आणि त्यांची पत्नी या दोघांनाही सांगली येथून मुंबईत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत पर्यटन संचालनालयाने केली.त्यांनाही त्यांच्या दुतावासाशी संपर्क साधून 3 एप्रिल रोजी अमिरीकेत पाठविण्यास यश आले आहे.
वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आलेल्या मालवीय देशाचे नागरिक असलेल्या नेडसन गणाला हे लोकडाऊन मुळे अडचणीत आले होते. त्यांच्याकडे असलेले सर्व पैसे संपल्याने त्यांना राहण्याची आणि जेवणाचीहीअडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या पर्यटकांशी संपर्क साधून पर्यटन संचालनालयाने बृहन्मुंबई मनपाशी संपर्क साधून त्यांच्या जेवणाची तजवीज केली. तर ते राहत असलेल्या हॉटेल मालकाला हॉटेल एसोसीएशन शी संपर्क साधून सदर पर्यटकांकडून हॉटेल भाडे न घेण्याबाबत सहकार्य केले. कोलोम्बिया देशाचे 3 नागरिक असलेले पर्यटकांचीही हीच अवस्था असल्याने त्यांची राहण्याची व जेवणाची सुविधा उपनगर कलेक्टर आणि बीएमसी च्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाने केली असून या पर्यटकाच्या देशातील दुतावासाशी संपर्क साधला असून लवकरच त्यांना त्यांच्या देशात पाठविण्यात येणार आहे. युके मधील बहुतांश पर्यटक राज्यातील विविध भागातून एकत्रित करून त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांचे विमान येत्या 15 एप्रिल रोजी मुंबईत दाखल होणार असून त्यांना परत पाठविण्यासाठी सर्व प्रक्रिया पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून केली जात आहे. 
एकीकडे कोरोनाच्या भीतीमुळे देशासह आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा असलेल्या मुंबईत सर्वत्र शांतता पसरली आहे.मात्र तरीही राज्यात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना अडचणीतून मार्ग काढून देत त्यांना त्यांच्या देशात सुखरूपपणे पाठविण्यासाठी पर्यटन सचिव आणि पर्यटन संचालनालयाने "अतिथी देव भव" या ब्रीदवाक्यानुसार आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे त्या त्या देशातील नागरिकांच्या मनात राज्याबद्दल भारत देशाबद्दल नक्कीच आदर निर्माण झाला असून यासाठी राज्याचे पर्यटन संचालनालय नक्कीच कौतुकास्पद ठरले आहे.