राज्यातील ८ खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता

महाराष्ट्र
 26 Mar 2020  289

*वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती*

लोकदूत वेबटीम 

मुंबई २६ मार्च 

 इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यात सर्वाधिक  ८ लॅब महाराष्ट्रातील असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या खाजगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने ‘करोना तपासणी केंद्र’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. असे यावेळी सांगितले.

मान्यता देण्यात आलेल्या लॅब मध्ये थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण २ हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.