शरद पवार,सातव,फौजिया खान,चतुर्वेदी,उदयनराजे,आठवले,कराड  राज्यसभेवर बिनविरोध

महाराष्ट्र
 13 Mar 2020  303

सातच अर्ज आल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार

चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची उमेदवारी

लोकदूत वेबन्यूज  

मुंबई १३ मार्च 

राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला असून आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानूसार या चौथ्या जागेसाठी फौजिया खान यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली आहे.

आता याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. कालपर्यंत चौथ्या जागेचा तीढा कायम होता. आज अखेर राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेली. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून पहिल्या जागेसाठी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे उमेदवार भागवत कराड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कालच उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी आपले अर्ज भरले आहेत. फौजीया खान यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या गोटातून विरोध असल्याचे बोलले जात होते. समन्वय समितीमध्ये चर्चा न करताच राष्ट्रवादीने या नावाची घोषणा कशी कली असा सवाल केला जात होता. मात्र पवार यांनी उध्दव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यासी चर्चा करून समन्वय समितीत हा निर्णय करून घेतल्याचे बोलले जाते.

शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गोटातील प्रियंका चतूर्वेदी यांना संधी मिळाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांचीही नावे या उमेदवारीसाठी चर्चेत होती. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक होते. परंतु शिवसेनेने दिग्गजांना डावलून चतूर्वेदी यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेवर कोण जाणार, हा प्रश्‍नही आता सुटला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या वाटपातील राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. सात जागांसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या चार तर भाजपच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

चौकट ..... आठवा अर्ज होणार बाद 

     राज्यसभा निवडणुकीसाठी राजेंद्र चव्हाण नामक व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी  अर्जावर नियमानुसार सूचक आणि अनुमोदक म्हनुज एकूण २० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. मात्र प्रत्येकवेळी अपूर्ण अर्ज दाखल करणाऱ्या राजेंद्र चव्हाण यांनी यावेळी ही अर्जावर अनुमोदक आणि सूचकांच्या सह्या घेतल्या नाही. त्यामुळे छाननीत हा अर्ज बाद होणार असून हि  निवडणूक अविरोध होण्यार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.