पराभव दिसत असल्याने खैरेंना नैराश्य

महाराष्ट्र
 21 May 2019  359

औरंगाबाद लोकदूत वेबटीम 

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे यांच वय झालं आहे. त्यांना चेकअपची गरज आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे  खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, अशी सणसणीत टीका हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. खैरे ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे यांचे जवळचे नेते आहेत, असेही जाधव म्हणाले.  खैरै यांना माझं चॅलेंज आहे. सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द केले तर मी सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. मला सासूने ना मदत केली ना सासऱ्याने. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पाठवली, असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. 50 लाख रुपये पकडले होते ते कोणाचे होते, हे हर्षवर्धन यांनी सांगावं, असंही खैरे म्हणाले होते. दानवे रोज हर्षवर्धन यांना रोज पैसे पाठवत होते. मी याचा आढावा घेतला आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी त्याआधी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केली आहे.