बुलेट ट्रेन पेक्षा शेतकरी महत्वाचा ,नव्या सरकारचा भाजप ला धक्का

महाराष्ट्र
 22 Nov 2019  524
भाजपला बसणार पहिला धक्का ; बुलेट ट्रेनचा निधी शेतकरी कर्ज माफीसाठी वापरणार

* काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे एकमत

लोकदूत वेबन्यूज
मुंबई 22नोव्हेंबर

राज्याच्या सत्तेत लवकरच विराजमान होणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीने भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्राचा अधिक आर्थिक हिस्सा असलेल्या मात्र याचा सर्वाधिक फायदा गुजरातला होणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्प राखडणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्राकडून या प्रकल्पासाठी दिला जाणारा आर्थिक हिस्सा हा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याचा एकमुखी निर्णय शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. याचा समावेश तिन्ही पक्षाने केलेल्या किमान समान कार्यक्रमातही केला असल्याची माहिती महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिली आहे.
मुंबई अहमदाबाद दरम्यान असलेल्या बुलेट ट्रेनचा जवळपास 1.10 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्रातील भाजपच्या सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात साठी निश्चित केला होता. गुजरात आणि मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन ची मार्गिका ही तब्बल 508 किमी ची असणार असून यात 12 स्थानकांच्या समावेश राहणार आहे. परंतु 12 पैकी केवळ 4 स्थानक हे महाराष्ट्राच्या हद्दीत येणार आहे. तर 8 स्थानक हे गुजरात राज्याला मिळणार असून गुजरात पेक्षा महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक हिस्सा अधिक असल्याने या प्रकल्पावरून राज्यात वाद निर्माण झाला होता. मात्र राज्यात भाजप सरकार असल्याने या वादाला दाबून केंद्राचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती. 1400 हेक्टर जमिनीवर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली.या मार्गिकेत एकूण 508 किमी पैकी 487 किमी उन्नत तर 22 किमी भूमिगत मार्ग राहणार आहे.या प्रकल्पाचा महाराष्ट्रापेक्षा गुजरात ला अधिक फायदा होणार असल्याने महाराष्ट्रातील भाजप सरकार गप्प का? असा सवालही त्यावेळी उपस्थित केला गेला होता. मात्र केंद्र सरकारचा दबाव असल्याने हा प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचा तत्कालीन भाजप सरकराने निश्चय केला होता.
परंतु राज्यात राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजप सत्तेतून बाहेर आला आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाने एकत्रित येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महाविकास आघाडीला अस्तित्वात आणणार आहे. तिन्ही पक्षाने राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिल्याने ते पाळण्यासाठी तिन्ही पक्षाने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षांनी आपल्या सरकारची दिशा ठरविण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला असून यात शेतकरी कर्जमाफीचा समावेश केला आहे.मात्र राज्याच्या तिजोरीत खळखळाट असल्याने निधी कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे राज्याचा सर्वाधिक आर्थिक वाटा असूनही महाराष्ट्राला हवा तेवढा फायदा होणार नसल्याने, बुलेट ट्रेन साठी राखून ठेवलेला निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याचा निर्णय तिन्ही पक्षाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा निर्णय आगामी सरकारचा गेमचेंजर होणार ? असा प्रश्न निर्माण झाला असून या निर्णयामुळे मात्र गुजरात आणि केंद्र सरकार सह राज्यातील भाजप पक्षालाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.