सत्ता आणि विरोधी पक्ष या दोन्ही पर्यायासाठी राष्ट्रवादीची तयारी

महाराष्ट्र
 02 Nov 2019  273
राष्ट्रवादीसाठी सत्ता आणि विरोधी पक्ष हे  दोन्ही पर्याय उपलब्ध

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खलबत्ते

* शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या निर्णयानंतर भूमिका ठरवणार

लोकदूत वेबन्यूज
मुंबई 3 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या "सिल्वरओक" या निवास्थानी शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेत सहभागी होणे आणि विरोधी पक्षात बसने या दोन्ही पर्यायावर चर्चा करण्यात आली असून दोन्ही पर्यायासाठी राष्ट्रवादी तयार असल्याचे समझते. सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक होणार असून सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस कडून होकार येताच राष्ट्रवादी काँग्रेस त्यानुसार पाऊले उचलणार असल्याचे कळते.
सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेतील समान वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही सरकार स्थापन केले नाही. परंतु सेना भाजप यांच्यात असलेला वाद हा खरा आहे की केवळ दिशाभूल आहे. हे अजून स्पष्ट नसून शिवसेना आणि भाजप यांच्यावर विश्वास न ठेवता विरोधी पक्षात बसण्याची तयारीही करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत ठरले आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत काँग्रेस कडून होकार येताच सत्तेत सहभागी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आताच करून ठेवाव्या यावरही निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संख्याबळानुसार विधानसभेत काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीच्या अधिक जागा असल्याने विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादी कडे येणार आहे. त्यामुळे या बाबत सखोल चर्चा करण्यात आली असून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून आल्याने ते आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे सदर जागा ही काँग्रेसला सोडायची की राष्ट्रवादीकडे ठेवायची यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.