देवेंद्र फडणवीस मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

महाराष्ट्र
 01 Nov 2019  1069

मंगळवारी वानखेडे स्टेडियम शपथविधी समारंभ

* आ. प्रसाद लाड आणि नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडून जय्यत तयारी सुरू 

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 1 नोव्हेंबर 

सण 2014 प्रमाणेच  प्रथम सत्तास्थापन करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच होणार असून या भव्य दिव्य शपथविधी समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आ. प्रसाद लाड आणि नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपविली आहे. या समारंभाची जय्यत तयारीही या दोघांनी सुरू केली असल्याचे या प्रक्रियेतील विश्वासू सूत्रांनी माहिती दिली आहे.

 

     विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला आहे. यात भाजप पक्ष सर्वाधिक जागेवर विजय प्राप्त करून मोठा पक्ष ठरला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आडमुठी भूमिका घेत असल्याने निकाल हाती येवून आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झाले नाही.  मुख्यमंत्री पदावरून सेना भाजप मध्ये अद्यापही "आम्हचाच मुख्यमंत्री" या मागणीवर घोड अडले आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबर पर्यंत असून तत्पूर्वी सरकार गठीत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आडमुठी भूमिकेकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी करण्याचा बी प्लॅन भाजपने आखला आहे. त्यामुळे 2014 मध्ये ज्या पद्धतीने भाजप ने प्रथम सत्ता स्थापन करून नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  तयारी सूरु केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून त्यांच्यासोबत भाजप चे अन्य काही मोजक्या नेत्यांनाही मंत्री पदाची शपथ देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू आ. प्रसाद लाड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी प्राथमिक तयारीही सुरू केली असल्याची माहिती मिळाली असून येत्या मंगळवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेदरम्यान शपथविधी समारंभ पार पडणार आहे.