भाजप मध्ये आयारामांना संधी तर उमेसवारी न मिळाल्याने भाजप नेते गॅसवर

महाराष्ट्र
 01 Oct 2019  498

भाजप मध्ये आयारामांना संधी तर भाजप नेते गॅसवर 

# माजी मंत्री सावरा यांच्या मुलाला तर दिलीप कांबळे यांच्या भावाला उमेदवारी 

# १२ महिला,९२ विद्यमान आमदार तर बाहेरून आलेल्या १० उमेदवारांना उमेदवारी 


लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई १ ऑक्टोबर 

 

 भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात भाजपच्या विद्यमान ९२ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून, चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत १२ महिलांना संधी देण्यात आली आहे. तर इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या १० आयारामांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्यूला घोषित करण्यात आला असून, भाजप व मित्रपक्ष १६४ जागा लढतील तर शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत.

या मंत्र्यांना पुन्हा संधी

गिरीश महाजन यांना जामनेरमधून, परळीतून पंकजा मुंडे, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मिरजमधून सुरेश खाडे, दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुख, निलंगामधून संभाजी निलंगेकर, गोरेगावमधून विद्या ठाकूर, शहर उत्तर सोलापूरमधून विजय देशमुख, सिंदखेडामधून जयकुमार रावळ, जामोद जळगावमधून डॉ. संजय कुटे, मदन येरावर यवतमाळ,अशोक उईके यांना राळेगाव येथून  या मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

विनोद तावडे, बावनकुळे, खडसे 'वेटिंग'वर

भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत आपल्या विद्यमान ९२ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली गेली. मात्र, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा मतदार संघ बदलून देण्याबाबत पक्षात मंथन सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले असून माजी मंत्री दिलीप कांबळे यांना तिकीट नाकारले आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू अनिल कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री विष्णू सावरा यांना तिकीट नाकारत  त्यांचा मुलगा डॉ. हेमंत सावरा यांना विक्रमगडमधून उमेदवारी दिली आहे.

या १२ महिलांना भाजपकडून उमेदवारी


ज्ञानज्योती बधाने पाटील (धुळे ग्रामीण), श्वेताताई महाले (चिखली), देवयांनी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर) मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मुक्ता टिळक (कसबा पेठ), स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), मोनिका राजळे (शेवगाव) तर मंत्री पंकजा मुंडेंना परळीतून उमेदवारी दिली आहे.

या आमदारांचा पत्ता कट

पुण्यातील कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी, पुण्यातील शिवाजीनगरचे आमदार विजय काळे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून दिलीप कांबळे, माजलगावमधून आर टी देशमुख, आर्णी राजू तोडसम, विक्रमगडचे विष्णू सावरा, शहादाचे उद्यसिंग पाडवी, मुलुंडचे सरदार तारा सिंग या ८ आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

या आयारामांना भाजपने दिले तिकीट

इतर पक्षांतून भाजपात आलेल्या काही नेत्यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिल्याचे दिसते. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, माण खटावमध्ये जयकुमार गोरे, वडाळातून कालिदास कोळंबकर, ऐरोलीतून संदीप नाईक, अकोलेतून वैभव पिचड, शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह, वाईतून मदन भोसले, सातारामधून शिवेंद्रराजे भोसले आदी आयारामांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपामधून गेलेल्या उदयनराजे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर जाहीर करण्यात आली आहे.