मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली- पंतप्रधान

महाराष्ट्र
 19 Sep 2019  432

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली,

पुन्हा आणूया आपले सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील जनतेला आवाहन

लोकदूत वेबन्यूज टीम

मुंबई 19 सप्टेंबर 

महाराष्ट्रात यापूर्वी राजकीय अस्थिरतेमुळे हे राज्य आपल्या क्षमतेनुसार गतीने विकसीत झाले नाही. पण गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतीशिल आणि राज्याला समर्पित सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे की, मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजकीय स्थैर्याचा फायदा उठवला पाहिजे. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे आवाहन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नाशिकमध्ये विराट जाहीर सभेत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी मा. पंतप्रधान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, प्रदेश निवडणूक प्रभारी व भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव, छत्रपती उदयनराजे भोसले, प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश जी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पणनमंत्री राम शिंदे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक आणि यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली. गेल्या पाच वर्षात त्यांच्या सरकारच्या काळात राज्याला स्थिरता, विकास, कायदा - सुव्यवस्था, सामाजिक सद्भाव, आधुनिक पायाभूत सुविधांचे काम, सांस्कृतिक वारश्याचा सन्मान, गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण, शेतकऱ्यांना संपूर्ण मदत, महिलांना धुरापासून मुक्ती आणि आदिवासींना आवाज मिळाला. फडणवीस सरकारचे प्रगतीपुस्तक हे महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी आहे आणि त्यामध्ये आगामी काळात निर्माण होणाऱ्या भव्यतेचे संकेत आहेत.

मा. पंतप्रधान म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे आपण अभिनंदन करतो की, त्यांनी गेल्या पाच वर्षांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 17000 गावे जलपरीपूर्ण केली. या कामाला आगामी काळात आणखी गती द्यायची आहे. एकदा महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला की, प्रत्येक क्षेत्रात राज्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही. मा. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात विकास समर्पित व भ्रष्टाचारमुक्त सुशासन दिले आहे. हे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांना ऊर्जा द्यायची आहे. राज्यात पुन्हा लोडशेडिंग होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार आवश्यक आहे. महाजनादेश यात्रा संपल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे काम सुरू झाले आहे. घरोघर जाऊन एकेक मतदाराला भेटायचे आहे आणि पुन्हा आपले सरकार सत्तेवर आणायचे आहे.

राम मंदिराबाबत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दोन तीन आठवड्यांपासून अयोध्येतील राम मंदिराविषयी काही उलटसुलट वक्तव्ये काही तोंडाळ लोक करत आहेत. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. संबंधित सर्व पक्ष आपली बाजू मांडत आहेत आणि न्यायालय सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहे. अशावेळी हे वक्तव्य सरदार कोठून आले यामुळे आपण अस्वस्थ आहोत. त्यांना संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण करायचा आहे का, हा प्रश्न आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर भरवसा असला पाहिजे. देशाच्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. आपण हात जोडून विनंती करतो की, कृपा करून प्रभू रामचंद्रासाठी डोळे झाकून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा.

छत्रपतींनी दिलेल्या पगडीच्या प्रतिष्ठेसाठी आयुष्य खर्ची घालू

मा. पंतप्रधान म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी स्वतः आपल्या डोक्यावर पगडी घातली हा आपण आपल्या आयुष्यातील बहुमूल्य क्षण मानतो. आपल्यासाठी हा सन्मान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती दायित्वाची सूचनाही आहे. या पगडीची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालू, त्यासाठी जनतेने आशिर्वाद द्यावा.

नया कश्मीर बनाना है, हर कश्मिरी को गले लगाना है

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याबद्दल ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये देशाचे संविधान पूर्णपणे लागू करावे हा सर्व 130 कोटी भारतीयांचा निर्णय आहे. जम्मू काश्मीरला हिंसा, दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय देशाच्या अखंडतेसाठीच्या आमच्या वचनबद्धतेमुळे आहे तसाच तो जनतेच्या आकांक्षाच्या पूर्ततेचे माध्यम आहे. कालपर्यंत म्हणत होतो की, वह कश्मीर हमारा है, आता घोषणा द्यायची आहे की, नया कश्मीर बनाना है, हर कश्मिरी को गले लगाना है. पुन्हा एकदा काश्मीरला स्वर्ग बनविण्याचा आपला संकल्प आहे. जुन्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे चाळीस वर्षे यातना सोसणाऱ्या जम्मू काश्मीरला या संकटातून मुक्त करणे हे संपूर्ण देशाचे काम आहे.

त्यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता, अविश्वास आणि हिंसाचाराचा प्रयत्न सीमेपलिकडून होत असला तरी त्या राज्यातील युवकांनी आता निर्धार केला आहे की त्यांना विकास आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत. जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या संधी आणि शक्यता निर्माण होत असताना आणि 370 कलम रद्द करण्याचा मोठा निर्णय लागू करण्यासाठी संपूर्ण देशाची एकजूट झाली असताना विरोधी पक्ष यामध्येही राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो यामुळे आपण हैराण झालो आहोत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जसे वागायला हवे होते, तसे ते वागत नाहीत. त्यांच्या विधानांच्या आधारावर परदेशात भारतावर टीका केली जाते हे दुर्भाग्य आहे. काँग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवारांसारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचे विधान करतो त्यावेळी दुःख होते. पवार यांना शेजारी राष्ट्र आणि तेथील शासक चांगले वाटत असतील तर ती त्यांची मर्जी आहे पण दहशतवादाचा कारखाना कोठे आहे तसेच अत्याचार आणि शोषण कोठे चालू आहे, हे सर्वजण जाणतात.

सरकारच्या शंभर दिवसात आश्वासनपूर्तीसाठी काम

त्यांनी सांगितले की, केंद्रामध्ये भाजपाचे सरकार नव्याने सत्तेवर आल्यास शंभर दिवस झाले आहेत. या काळात नव्या भारताचा नवा दृष्टीकोन स्पष्ट झाला आहे. विकासाचा जोश आहे आणि भारताच्या वैश्विक ताकदीचा संदेशही आहे. या काळात आर्थिक सुधारणा आणि रोजगारनिर्मितीचा प्रयास केलेला आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्यासाठी देशभरात 20,000 कोटींचा निधी देण्यात आला. छोटे शेतकरी तसेच छोटे व्यापारी – दुकानदार यांच्यासाठीची पेन्शन योजना सुरू झाली आहे. गावे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशातील पन्नास कोटी पशुधनाच्या लशीकरणास सुरुवात केली आहे. आदिवासी समाजातील मुलांसाठी एकलव्य आदर्श शाळा निर्माण करण्याचा निर्णय केला होता, त्यानुसार 465 शाळांचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत घरोघर वीज पोहचवली आणि शौचालयांचे काम केले त्याचप्रमाणे आता घरोघरी पिण्याचे पाणी पोहचविण्याचा निर्धार केला असून त्याचे काम सुरू झाले आहे.

ते म्हणाले की, महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करताना देशाला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती देण्याचा संकल्प करावा. 2022 पर्यंत देश एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करावा, हा आपला निर्धार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्याचे काम करायचे आहे.

सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. मा. मोदी यांच्या अपेक्षेनुसार आपण पाच वर्षे प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे सरकार चालविले असून आपल्या सरकारला कोठेही भ्रष्टाचाराचा डाग नाही. महाजनादेश यात्रा ही 4000 किलोमीटरची यात्रा म्हणजे विलक्षण प्रवास होता. राज्याच्या ज्या ज्या भागात गेलो तेथे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मा. मुख्यमंत्री म्हणाले की, पाच वर्षांत उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात राज्य आघाडीवर आले आहे. गेल्या पाच वर्षात केवळ लघु व मध्यम उद्योगात 89 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. आम्ही स्वतःला सेवक मानतो म्हणून जनतेला कामाचा हिशेब देतो. आम्ही कायम सेवकच राहू. जनतेने पाच वर्षे पुन्हा एकदा पारदर्शी व प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी द्यावी. जनता पुन्हा सेवकांनाच निवडून देईल असा विश्वास आहे.

मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाजनादेश यात्रेचे राज्यात सर्वत्र विक्रमी स्वागत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे, अखंड परीश्रम करणारे व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांनी सर्व समाजाला दिलासा दिला आहे. अशक्य वाटणारी अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे यात्रेमध्ये जनतेने त्यांना आशिर्वाद दिला. राज्यातील प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी आगामी काळातही हेच मजबूत सरकार हवे आहे.

मा. गिरीश महाजन यांनी प्रास्ताविक केले.