धुळे घटना प्रकरणी कामगार आयुक्तांना चौकशीचे आदेश

महाराष्ट्र
 31 Aug 2019  574

*शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार-- कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची घोषणा*

*. कामगार कायद्यानुसार दुर्घटनाग्रस्तांना लाभ मिळवून  देणार 

* औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयचे ( DISH) अधिकारी आणि कारखाना मालकाचीही चौकशी होणार 

मुंबई दि 31 ऑगस्ट 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या  कामगारांबद्दल कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. संबंधित फॅक्टरी मालक व विभागाच्या  औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयचे ( DISH) अधिकारी यांचीही चौकशी करून या जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर  कठोर कारवाई करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा कामगार मंत्री डॉ. कुटे यांनी केली आहे.

      शिरपूर येथे झालेल्या दुर्घटनेची आणि येथे झालेल्या कामगारांच्या मृत्यूची राज्य सरकार आणि कामगार मंत्री डॉ कुटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेत दखल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मृतकांच्या परिवाराला शासनाकडून 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहिर केले आहे. परंतु या कारखान्याच्या शेजारी लोकवस्ती होती. त्यामुळे या घटनेतील मृतकांच्या परिवाराला समबंधित कंपनीच्या मालकाकडूनही प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाईल अशी माहिती कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी दिली. या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेविषयक सर्व  प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, रसायन निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित पणे राबविली जात होती का, आणि रसायने धोकादायक होती का याचा तपास कामगार आयुक्तांकडून केला जाईल, असे कामगार मंत्री यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या सूचनाही कामगार आयुक्त यांना देण्यात आल्या असून कामगार उपआयुक्तांना तातडीने धुळे येथे प्राथमिक चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे.  या दुर्घटनेत जखमी झालेले  कामगार आणि मृत्यूमुखी पडलेले कामगारांचे कुटुंबातील सदस्यांना कामगार कायद्याच्या अंतर्गत जी मदत देणे शक्य आहे ती सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेबाबत धुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच कामगार अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे कामगार मंत्र्यांनी स्पष्ट केले.
        सदर दुर्घटना ही अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा घटना घडणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी  राज्यातील सर्व अति धोकादायक कंपन्यांची तात्काळ चौकशी करण्यात येईल. तसेच येत्या मंगळवारी मंत्रालयात सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कंपनीतील कामगारांची सुरक्षा, कंपनीने सर्वबाबतीत घ्यावयची दक्षता, याबाबत चर्चा करुण एक कृतीआराखडा तयार करुण या सबंधित सर्व विभागांना पाठविला जाईल अशी माहिती कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी दिली.