विरोधी पक्षनेतेपदही विरोधकांना मिळणार नाही.

महाराष्ट्र
 30 Aug 2019  438

 विरोधी पक्षनेतेपदही विरोधकांना  मिळणार नाही

लोकदूत वेबन्यूज टीम 

हिंगोली 30 ऑगस्ट 

  काँग्रेस व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी 15 वर्ष सत्ता भोगत असतांना सत्तेची मुजोरी केली. म्हणूनच  जनतेने लोकसभा निवडणुकीत विरोधकांना पराभूत केले आणि आता त्यांच्या यात्रांकडेही  जनता पाठ दाखवत आहे. या पक्षाच्या नेत्यांच्या मुजोरीमुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही त्यांना विरोधी पक्षनेता बनविण्याइतक्या जागा मिळणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे महाजनादेश यात्रेच्या  जाहीर सभेत ते बोलत होते.सत्तेच्या पाच वर्षात राज्यातील दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, मराठा समाज, ओबीसी, धनगर समाज अशा सर्व घटकांसाठी भाजपा महायुती सरकारने काम केले. आपण केलेले काम जनतेला सांगायचे आणि जनतेचा आशिर्वाद घ्यायचा यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्या यात्रेसाठी जमलेल्या लोकांना मैदाने पुरत नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांच्या सभांनी मंगल कार्यालये भरत नाहीत अशी परिस्थिती आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

ते म्हणाले की, आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचेच सरकार समस्या सोडवू शकते, असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे जनतेने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा वर्षे सत्ता दिली पण त्या काळात त्यांची मुजोरी इतकी वाढली की ते सामान्यांना विसरले आणि आपली संस्थाने उभी करून मोठे झाले. त्यामुळे जनतेने त्यांना पराभूत केले. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी दहा टक्के खासदार किंवा आमदार असावे लागतात. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याइतक्या जागा मिळाल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीतही त्यांची अशीच अवस्था होईल.

त्यांनी सांगितले की, जनतेने नाकारले तरी विरोधक सुधारले नाहीत. ते म्हणतात की, त्यांना जनतेने नाही तर ईव्हीएमने हरवले. २००४ नंतर सलग दहा वर्षे निवडणुका जिंकल्या त्यावेळी त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगले होते आणि २०१४ पासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाला विजय मिळाला की ईव्हीएम खराब असे म्हणतात. बिघाड ईव्हीएममध्ये नाही तर विरोधकांच्या डोक्यात आहे. ईव्हीएम मतदान करत नाही तर जनता मतदान करते हे ते विसरले आहेत. मतदानाला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात मोदीजी आहेत त्यामुळे तो गेला की कमळाचेच बटण दाबतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात.

ते म्हणाले की, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा आमचा निर्धार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी मराठवाडा वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणे या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. मराठवाडा वॉटरग्रीड योजनेमुळे ६४,००० किलोमीटरची पाईपलाईन टाकून प्रत्येक शहरात आणि गावात पाईपलाईनचे शुद्ध पाणी पोहचविण्यात येईल. त्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचे टेंडर काढले आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून जालना जिल्यातील १७६ गावांमध्ये पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांची टेंडर पंधरा दिवस ते एक महिन्यात काढण्यात येतील. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ कधीच राहणार नाही. त्याचबरोबर सिंचनाचा दुष्काळ दूर करण्यासाठी निर्णय घेतला आहे. कोकणात पश्चिम वाहिनी नद्यांचे ३०० टीएमसी पाणी समुद्रात जाते त्यापैकी १६७ टीएमसी पाणी लिफ्ट करून गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत. त्यातून संपूर्ण मराठवाड्यात सिंचन सेवा देणार आहोत.