शिवसेना भाजप आमदार विधानसभेत भिडले

विधिमंडळ
 17 Dec 2019  341

विधानसभेत भाजप शिवसेना आमदार भिडले

* शिवसेना आ. देशमुख आणि भाजप आ.पिंपळे यांच्यात फ्रिस्टाईल

* सामना वृत्तपत्रातील बातम्यांचे फलक विरोधकांनी झळकावले

लोकदूत वेबटीम 

नागपूर 17 डिसेंबर  

विधानसभेत विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत देण्याच्या मागणीवरून जोरदार गोंधळ घातला. या दरम्यान शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांची चक्क हाणामारी झाली. मात्र वेळीच भाजप नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मध्यस्थी करीत दोघांना दूर केले. यामुळे सभागृहात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना सक्त ताकीद दिली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची आठवण करून देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करून आपला दिलेला शब्द पाळावा अशी आक्रमक मागणी लावून धरली. पुरवणी मागण्यातही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप यावेळी सरकारवर केला.अध्यक्षांनी सदर सूचना नियमात बसत नसल्याचे सांगत सूचना नाकारली असता , आपली मागणी लावून धरण्यासाठी विरोधी बाकावरील भाजप सदस्य वेल मध्ये उतरून घोषणाबाजी करीत अध्यक्षांना घेराव घातला. तर भाजप आमदारांनी शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची बातमी असलेले फलक सभागृहात झळकावले. यावर अध्यक्ष नाना पटोले यांनी सक्त ताकीद देऊन कारवाई करण्याचा इशारा दिला. या दरम्यान शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी विरोधकांकडे धाव घेत विरोधकांच्या हातातील बॅनर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याला शिवसेनेचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनीही साथ देत बॅनरखेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मूर्तिजापूर मतदार संघातील भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी जोरदार विरोध करीत आ. देशमुख यांच्याकडे धाव घेत एकमेकांत भिडले. हा प्रकार आटोक्यात घेण्यासाठी वेळीच शिवसेनेचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही दूर नेले.हा प्रकार या सरकारच्या काळात पहिल्यांदाच घडल्याने सभागृहात काहीकाळ वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकारामुळे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहाचे कामकाज प्रथम 30 मिनिटांसाठी तर दुसऱ्यांदा तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी 10 मिनीटासाठी कामकाज तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांची कानउघाडणी केली.घडलेली घटना ही सभागृहाच्या परंपरेला अशोभनीय असून यापुढे असा प्रकार घडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशी ताकीद देत दोन्ही बाजूच्या आमदारांना समज दिली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वतीने भविष्यात असा प्रकार होऊ न देण्याची ग्वाही देत सभागृहाची परंपरा आणि नियमांच्या चौकटीत राहूनच जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन यावेळी अध्यक्षांना दिले. शिवाय आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे सांगत 25 हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची घोषणा तात्काळ करा अशी मागणी पुन्हा लावून धरली. यावर पुन्हा विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकार विरोधात हाणामारी न करता वेल मध्ये उतरून घोषणाबाजी केली.या दरम्यान शासकीय कामकाज उरकवून अध्यक्ष नाना पटोले यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.