सोमय्या कुठे?गृहमंत्र्यांची. केंद्राकडे विचारणा

मंत्रालय
 12 Apr 2022  560

सोमय्याबद्दल केंद्राला विचारणा करणार 
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 12 एप्रिल 


आयएनएस विक्रांत प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असलेले किरीट सोमय्या यांच्याबद्दल केंद्र सरकारकडे विचारणा करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली. सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत असे केंद्राला विचारू, असे ते म्हणाले.
मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्या  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वळसे पाटील यांनी, दुसऱ्यांवर आरोप करणे  सोपे असते  आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरे  जायचे  नाही हे शूरपणाचे लक्षण नाही असा जोरदार टोला लगावला.

गुणरत्न सदावर्ते प्रकरणाविषयी रितसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहेत.  त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना माहहती  उघड करणे  योग्य नाही,  असेही वळसे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात संगितले. 

सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते, तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. याप्रकरणी  संबंधित पोलीस उपायुक्त यांची  बदली करण्यात आली आहे.  तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे. अधिक चौकशी सुरू असून  चौकशीत जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही दिलीप वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य  करू नये 
दरम्यान राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी वक्तव्य करू नये, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. जनतेनेही अशा विधानांना  बळी  पडू नये, असेही ते म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आज गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी सण  शांततेत आणि आनंदाने पार पाडावेत यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. या दरम्यान कुणी काही करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अतिशय जबाबदारीने परिस्थिती हाताळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.